Tuesday, October 27, 2015

आपली आवड

आपली आवड

ही माझी सगळ्यात पहिली कथा.
मी कधी कथा वगैरे लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मायबोलीवर आले, तिथल्या उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घ्यायला लागले, मग आपणही काही लिहून पहावी अशी ऊर्मी निर्माण झाली. कॉम्प्युटरवर मराठी टाईप करण्याची मजा काही वेगळीच... मनात येईल त्याक्षणी लिहिता येतं, नको ते खोडता येतं, तिसरी ओळ पाचव्या ओळीच्या ठिकाणी आणि सातवी ओळ चौथ्या ओळीत सहजतेने नेता येते. खाडाखोडी शून्य. हस्ताक्षराची फिकीर बाळगायचं काही कारणच नाही. तर, या सगळ्या गोष्टींमुळे मला लिहिण्याची आवड निर्माण झाली. आणि तश्या दृष्टीने विचार करण्याची, परिस्थितीकडे बघण्याची सवय लागली. 'चांगलं लिहिते आहेस, अजून लिही' असं ढोसणारे, उत्तेजन देणारे मैत्र मला मायबोलीवरच लाभले.
मला लिहायला उद्युक्त करणार्‍या मायबोलीचे अनेक आभार!!
******************************************
कर्कश्य वाजणार्‍या मोबाईलच्या अलार्मने चित्राला जाग आली. मनाशी चरफडलीच ती. खरं म्हणजे उठल्यावर प्रसन्न वाटावं म्हणून तिच्या मोबाईलवर तिने मंजूळ बासरीची धून अलार्म टोन म्हणून सेट केली होती. पण आत्ता वाजला तो मोबाईल तिच्या नवर्‍याचा, अमितचा होता. तो गाढ झोपला होता, तिचा मोबाईल पलिकडे टिपॉयवर ठेऊन... नेहमीच तो अशी मोबाईलची बदलाबदली करून आपली आवड करत असे. त्याचं पांघरूण खसकन ओढून त्याला उठवायचा असूरी विचार तिच्या मनात आला पण नंतरचं भांडण निस्तरायला तिच्या घड्याळाला वेळ नव्हता. भराभर आन्हिक आटपून ती स्वयंपाकघरात आली आणि तिच्या लक्षात आलं की दूधवाला मुलगा आज येणार नाहीये. तिला खाली उतरणं भाग होतं. तिचे सासूबाई सासरेबूवा मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांच्या यायच्या रस्त्यावरच डेरी होती पण हातात पैश्यांची अडचण होते ह्या सबबीवर ते दूध आणणं टाळत असत.
तशी आजची डब्याची घाई नव्हती. शनिवार असल्याने सकाळचा पोटभरीचा नाश्ता, अर्थात ब्रंच केलं तरी चालत असे. तिने कालच रात्री इडल्या करण्यासाठी पीठ वाटून ठेवलं होतं. चटणीची तयारी करायला घेतली आणि लाईट गेले. अस्सा राग आला ना तिला. 'आपली आवड' दुसरं काय. हा तिचा अगदी आवडता शब्द होता. स्वत:च्या सोईप्रमाणे लोकं दुसर्‍याचं (खरं म्हणजे तिचंच) प्लॅनिंग बिघडवतात, त्यासाठी योजलेला हा खास शब्द होता. भारनियमनाची वेळ खरी दुपारची होती. पण वीज नियामक मंडळाला चित्राची भंबेरी उडवायची होती म्हणून त्यांनी सकाळीच लाईट घालवले. आता आंघोळीचं पाणी गॅसवर तापवावे लागेल आणि शिवाय चटणी नाही केली तर कोणीच त्या इडल्याना तोंड काय हातही लावणार नाही याची तिला खात्री होती. आता काय करावं या विचारात असतानाच तिचे सा.बा. - सा.बू. आले. त्यांचा चहा, कॉफी करताना तिला डोळ्यासमोर चटणीच दिसत होती. सांबार करता करता तिला अचानक आठवलं की फ्रिजमध्ये मिरचीचा ठेचा आहे. हुश्य!! हायसं वाटलं चित्राला. त्यात दही घालून खमंग फोडणी घातली आणि घड्याळात पाहिलं. तिला ऑफिससाठी निघायला फक्त १ तासच होता. 'मी लावते इडल्या, तू जा तुझं आवर' असं सा.बा. नी म्हणताचक्षणी ती आंघोळीला पळाली. पाणी फारसं कडक तापलं नव्हतंच. तशीच कुडकुडत आंघोळ उरकली तिने.
'मी आज येत नाहीये सोडायला, तू रीक्षाने जा स्टेशनला' असं अर्धवट झोपेत बडबडून तिला काहीच बोलायची संधी न देता अमित कूस बदलून पुन्हा झोपून गेला. त्याला दोन चापट्या मारायचा मोह तिने कसाबसा आवरला. त्याला आज सुट्टी आणि हाफ डेच असला तरी चित्राला आज ऑफिस होतं. घाईघाईत नाश्ता करता करता पेपर वाचून ती निघाली तेव्हा तिला ५ मिनीटे उशीरच झाला होता. रिक्षा मिळून ती स्टेशनला पोचली तेव्हा चांगलाच उशीर झाला होता. रेल्वेची काय कायमच आपली आवड असते असा विचार करत ती स्टेशनवर पोचली तेव्हा इंडीकेटर्स बंद पाडून रेल्वेने पहिली सलामी दिली होती.
'शी बाई, दिवसाची सुरुवाताच वैतागाने झाली की अख्खा दिवस वैतागात जातो' असं म्हणत म्हणत ती प्लॅटफॉर्म उतरली. धक्काबुक्की करत मिळेल त्या गाडीत चढली आणि एकदाची ऑफिसला पोचली.
तिच्या नशीबाने ऑफिसमधे कोणी आपली आवड केली नाही. काम करता करता ४ तास कसे भुर्रकन ऊडून गेले तिलाच कळले नाही. मधे एकदा अमितने फोन करून ऑफिसला नीट पोचलीस ना विचारले. तेवढाच कय तो डिस्टर्बन्स. त्या ५ मिनीटांच्या फोनमधेही तिने सकाळी मोबाईलची अदलाबदल केल्याबद्दल आणि स्टेशनला सोडायला न आल्याबद्दल जरा जास्तच स्पष्टपणे तिची नाराजी व्यक्त केली.
ऑफिसनंतर चित्राने आणि तिच्या मैत्रीणीने ऑफिसजवळच्या मोठ्या पार्लरमध्ये फेशियलसाठी जायचं ठरवलं होतं. पण कँटीनमध्ये जेवताना अमितचा फोन आला की नागपूरचे काका काकू आलेत तर तू लवकर घरी ये. तिचा पडलेला चेहरा पाहून मैत्रिण काय समजायचं ते समजली आणि पुढच्या शनिवारचं नक्की करून दोघीही आपल्या वाटेला लागल्या. पुन्हा एकदा ट्रेनच्या गोंधळातून ती घरी पोचली तेव्हा पाहुण्यांनी गजबजलेलं घर तिचीच वाट पाहत होतं.
पाहूण्यांची सरबराई करता करता चित्रा चांगलीच जेरीला आली होती. कारण प्रत्येकाची आपली आवड. कोणाला साखरेचा चहा, कोणाला बिनसाखरेचा, कोणाला कॉफी, कोणाला सरबत. सरळ बेडरूममधे जाऊन झोपावं असं वाटत होतं, पण काय करणार? प्रत्येकाची आपली आवड जपणं हेच तिचे संस्कार होते ना... तिच्या आवडीबद्दल तिला कोणीच विचारत नव्हतं. तिने आपलं थोडसं उरलेलं सरबत एका ग्लासमधे घेतलं आणि बाहेर जाऊन गप्पा मारायला बसली. तेवढ्यात काकूच्या नातवाने सरबताचा ग्लास फोडला.
"अगं लहानच आहे तो, काही कळत नही त्याला अजून" ही वर काकूंची सारवासारव.
"लहान काय चांगला ८ वर्षाचा घोडा झालाय. आणि काकू तिच्या रुखवतातला होता तो ग्लास, आता गेला ना सेट वाया" असं अमित म्हणाल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
'मी ह्या सगळ्यांना मावशीकडे सोडून येतो, आई बाबा पण त्यांच्याबरोबर जाताहेत. तू रात्रीचं काही करू नकोस, बाहेरच जाऊ जेवायला. मला यायला तास दीड तास तरी लागेल, तोपर्यंत तू छानशी झोप काढ.' असे अमितने तिला सांगताच तिचा चेहरा कृतज्ञतेने भरून आला. जरा जास्तच उत्साहाने तिने सगळ्याना 'बाय' केले.
संध्याकाळी मात्र काहीच प्रॉब्लेम न येता त्या दोघांचा कार्यक्रम नीटपणे पार पडला. 'तुला आवडतो म्हणून पिझ्झा खाऊया.' 'आईसक्रीम नको, कुल्फी खाऊया तुला आवडते म्हणून' असं म्हणत म्हणत अमितने तिला खुलवलं. सकाळचा राग ती अगदी विसरून गेली. तिला आवडते म्हणून अमितने आणलेली मराठी नाटकाची डीव्हीडी बघत, शेवटी 'आपली आवड' जपणारं कोणीतरी आहे ह्या समाधानात ती अगदी गाढ झोपून गेली.

No comments:

Post a Comment