Tuesday, October 27, 2015

हार..

हार..

ही कथा माझ्या blog वरूनच घेतली आहे. New Jersey च्या साहित्य कुंज मध्ये २०१० साली सौ. राजेश्री कुलकर्णी यांच्या संपादनाखाली प्रकाशित झाली होती, त्यानंतर श्री. अशोक विद्वांस यांनी गुजराथी मध्ये भाषांतर केले Philadelphia च्या त्र्यमासिकासाठी. दोघांचेही विनम्र आभार. येथे माझा शाळा मित्र आणि माबो चा चाहता राजू उर्फ विनायक परांजपे साठी खास सदर करीत आहे.
शॉवर मध्ये गरम पाण्यच्या सरी अंगावर पडल्या आणि जेनीला वाटलं सगळा थकवा जणू त्याबरोबर वाहून चालला आहे.
दिवसभर ऑफिसमध्ये मिटींग्ज, कॉन्फ़रन्सेस नाहीतर टेबलावर बसून पेपरवर्क, जीव अगदी थकून जातो. पण तरिही हे तीचं आवडीचं काम होतं,
आजही जेव्हा बजेट मिटींग मध्ये तिने सगळे डीटेल्स् बाराकाईने मांडले आणि काय उपाय केल्यावर कंपनीला किती फायदा होऊ शकतो हे दाखवून् दिले तेव्हा केवळ तिचा बॉस रिचर्ड्सच नाही तर वेब्-कॉन्फ़रन्स वर असलेले मोठे मोठे एक्झीकुटीव्स सुद्धा एकदुम इम्प्रेस्स झाले. रिचर्ड्स तर तीला हळूच् म्हणला सुद्धा "या वेळेचा बोनस नक्की !!".
त्यावेळी त्याच्या डोळ्यतलं कौतुक आणि विश्वास बघुन तर तिला अजूनच हुरुप आला.
"येवढा लट्ठ् पगार उगाच नाही घेत मी!" ती स्वत्ःशीच खुश होऊन मनात म्हणाली.
आत्ताही ते आठावून तिला खुप छान वाटल, पण काही मिनिटंच. मनावरचं मळभ पुन्हा साचायाला लागलं. गरम पाण्याबरोबर शरीराचा थकवा जाईल पण मनाची ही उदासी कशाने जाईल?
तिला डॉ. मारियाचे शब्द आठवले , "जेव्हा मन उदास होईल ना तेव्हा तूझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणांची आठवण कर."
तिनेही आठवायचा प्रयत्न् केला, तिचं बालपण, कॉलेज , मग रे च्या प्रेमात पडणं, ते ध्ंन्द दिवस, मग लग्न ....
"छे....नेहमीचच...तेच तेच आठवायचं ...एकाच औषधाचा शरिरावर जसा परिणाम होणं बंद होतं ना, तसच त्याच त्याच आठवणींचा मनावर काहीच परिणाम होत नाहीय. मारियाशी बोलयाला हव्ं यावर..."
रे शी चाललेला गेल्या कित्येक दिवसांचा अबोला आता अगदी असह्य झालाय, पण दर वेळेला तिनेच का म्हणुन माघार घ्यायची?
खरतर तिलाही माहीती होतं कि त्याच्या तर लक्षातही नसणार कि त्यांचं भांडण झालय आणि ती रागावली आहे ते. तो नेहमीसारखाच त्याच्याच विश्वात असणार.
ती बोलायला जरी गेली तरी तो अगदी नेहमीप्रमाणेच बोलेल.
"पण नाहीच, त्यालाही कळुदे एकदा , मला पण भावना आहेत त्या!"
पण याच रे वर प्रेम केल होत्ं ना तिने ? त्याचा हाच गुण तर तिला वेगळा वाटला होता, स्वताःतच गुंग रहाणं, जगाची पर्वाच न करणं.
तिला हे कधीच जमलं नाही. तिचं सगळं आयुष्य कोणाना कोणाला खुश करण्यातच गेलं. लहानपणी मॉमला, मग टीचर्सना, मित्र-मैत्रिणींना , नंतर बॉसला आणि रे ला.
रे तर तीला नेहमीच म्हणतो की स्वतःसाठीही जग थोडी! यावरुनच वाद झाला होता त्यादिवशी.
"स्वतःसाठी जग म्हणे , म्हणजे काय करु ? पाच वर्ष झाली लग्न करुन , त्यापुर्वी एकत्र रहात होतो तीन वर्ष, म्हणजे गेली आठ वर्ष तीच तर सांभाळतेय सगळं.
येवढ्या लहान वयात येवढी जबाबदारीची पोस्ट, येवढा पगार. शिवाय, त्याच्या छंदावर, रोज नवनविन म्यूझिक इन्स्टूमेन्ट्स वर होणारा खर्च, सगळं तिच्याचमुळे तर होतय. स्वतःसाठी जग म्हणे"
तो त्याच्या संगीतात बुडुन गेलेला. आपल्याला जे आवडतं तेच आणि फक्त तेच म्युझिक करणार. त्याला बाजारात कींमत मिळो न मिळो. कुठलीही तडजोड करणारच नाही हा त्याचा हट्ट्.
"जेव्हा त्यांना कळेल माझी खरी किंमत तेव्हा बघ कसे येतील झक्कत !"
त्याच्या याच गुणाच कमालीचं कौतुक वाटलं होतं तिला ,जेव्हा ती रे ला पहिल्यांदा भेटली होती बार मध्ये.
ती तेव्हा नोकरी सांभाळुन मास्टर्स् ईन् मॅनेजमेन्ट् करत होती, मैत्रिणीबरोबर घर शेअर करत होती, शिवाय लहान बहीणीलाही शिक्षणासाठी मदत करत होती
आणि रे, एक बेधूंद , बेफ़िकिर जिवन जगत होता.
एकटाच रहायचा, शाळेत म्युझिक शिकवायचा तेही फ़क्त पोटापुरत कमवायला आणि ईतर वेळ आपल्याच जगात, संगीतात बुडलेला असायचा.
दोघांचीही पहील्या भेटीतच घट्ट् मैत्री झाली. रे च्या बरोबर तीही थोडी बेफिकीरीत जगायला शिकली. प्रथमच काही वेळ सगळं विसरुन आपल्या मनाप्रमाणे वागायला लागली आणि रे च्या प्रेमात स्वतःलाच हरवुन बसली.
मग दोघे एकत्र राहू लागले. तिला सहा आकडी पगराची नोकरी मिळाली , मग तिनेच रे ला सांगितलं,
"आता तु फक्त तुझ्या कलेकडे लक्ष दे, मला भरपुर पैसे मिळताहेत, आपल्या दोघांनाही खुप आहेत."
पुन्हा एकदा ,स्वतः खुप कष्ट करुन रे ला खुश ठेवण्यात ती गुंतून गेली. तिला त्यातच आनंद मिळायचा. खरतर तिचा मूळ स्वभावच तो होता.
रे सुद्धा आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे आपल्या विश्वात गुंगून गेला. आपला संपुर्ण वेळ स्टुडीओमध्येच घालवयला लागला.
पण तीने जे त्याला दिले त्याची जाणीव मात्र त्याला होती. तोही प्रेम करत होता ना तिच्यावर.
दोघेही आपापल्या विश्वात आणि एकमेकांच्या प्रेमात अगदी मजेत जगत होते.
मग याच नात्याला एका सुंदर बंधनात बांधुन दोघांनीही आपल्या प्रेमाची जणु कबुलीच दिली जगाला!
केवळ तिच्याचमूळे आपल्याला जे हवं ते मोकळेपणाने करायची संधी मिळतेय, हे तो नेहमी बोलून दाखवायचा. पण एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश जरुर मिळेल याची पूर्ण खात्रीच होती त्याला.
त्याच्या तिच्यावरच्या विश्वासाने तिला अधिकच उत्साह यायचा त्याच्यासाठी काहीही करयचा. मग त्याला यश मिळो न मिळो!
"मग झालंय काय अलिकडे ? काय बिनसलय?" या विचारांनी तिचं मन अधीकच उदास झालं.
लगेचच सगळ्ं आटोपुन् ती बाथरूमच्या बाहेर् आली, रे चे कपडे बेडवर तसेच पडले होते, ते बघुन आठ्या चढल्या तिच्या डोक्यावर!
समोरच लावलेला तिचा पजामा घालुन किचन मध्ये गेली. नेहमीप्रमणेच त्याने स्वतःचं सॅंडविच करुन घेतलं होतं, किचन मध्ये सगळा पसारा तसाच , वैतागून मग तीने आवरलं भरभर, स्वत्ःला दोन सॅंडविचेस केली, एक पॅक करुन फ्रिज मध्ये ठेवलं उद्याच्या लंच साठी आणि दुसरं घेवून टीवी समोर जाउन बसली.
बेसमेंट मधुन त्याच्या म्यूझिकचा आवाज येतच होता. पूर्वी ती जाऊन बसत असे ऐकत, पण हल्ली नाहीच वाटत जावसं. तरिही, तिचे कान ऐकतच होते आणि नकळत मन दादही देत होतं.
"खरंच, कुठल्या प्रोजेक्ट्साठी करतोय हा हे गाणं? छान आहे. ड्रम बिट्सच्या मस्त् रिथम बरोबर गिटारचा हा पिस अगदी छानच जुळून आलाय" जाऊन सांगायला काही हरकत नव्हती, पण नाहीच गेली ती.
ती जेव्हा कधी त्याला , तिच्या काही अचिव्हमेंन्ट्स बद्द्ल सांगे , की तो म्हणायचा,
"त्या कंपनीच्या फायद्यासाठी येवढी कशाला कष्ट् घेतेस? काय मिळतंय तुला? तो तुझा बॉस तुला उगीचच चढवून आपलाच फायदा करुन घेतोय. तु खुप टॅलेन्टेड आहेस. दुसरं काहीतरी स्वतःच असं कर"
"स्वतःचं कर म्हणे, याच नोकरीमुळे तुमचे हे सगळे प्रयोग चालु आहेत मिस्टर. मी हे करतेय आणि आणतेय पैसा म्हणुनच तर तू जगतोयेस बेफिकिर." तो नुसताच हसायचा. तीला ती तिच्या कर्तुत्वची पावतीच वाटायची.
पण हल्ली याचापण कंटाळा यायला लागला होता. काय हवयं तेच कळत नव्हतं.
तो अजुनही त्याच्या आयुष्याचं स्वप्न पूरं करायच्याच धुंदीत होता, सतत आपल्याच दुनियेत असायचा. तसा तिला काही मज्जाव नव्हता. पण आता तिलाही पूर्वीसारखा रस नव्हता राहीला. तेही त्याने अगदी सहज स्विकारलं होतं. ना कसली तक्रार ना रुसवा. संगीतातच सदानकदा रमलेला.
तीही रमलीच होती तिच्या करिअर करण्यात पण ती सगळं मिळाल्यासारखी "आता काय" असं म्हणत कंटाळली होती.
बरोबर चालता चालता, त्यांच्या वाटा कूठेतरी विभागल्या होत्या.
सहजच् तिची नजर बाहेर गेली, बाहेर अजूनही उजेड होता. खुप दिवसांनी, फिरायला जायचा विचार मनात आला आणि ती उठलीच पटकन.
वर जाऊन ट्रॅकसूट घालून आली आणि शूज घालतच होती तेव्हढ्यात, रे बेसमेंट्मधून वर आला.
"अरे हे काय, जिम मध्ये जातेयस?"
"याच्या लक्षातही नाहीये की मी याच्यावर रागावले आहे ते, जाउदे, आता हाच आलाय ना बोलायला" तिच्या मनात आलं.
"नाही , मी फक्त् बाहेर फेरफटका मारुन येते."
"चल, मी पण येतो. आज दिवसभर बाहेर बघीतलं सुद्धा नाही मी!" मनातून सुखावली ती.
मग ती दोघे खुप दिवसांनंतर, पुर्वी जायची तशीच , न ठरवताच त्याच जुन्या वाटेने चालू लागली.
त्या वाटेवर एक ट्रॅक बनवला होता, गर्द झाडी होती दोन्हीकडे, मधुनच एक छोटीशी पायवाट जायची. तीला खुप आवडायचं तिथे चालायला.
पक्षी किलबिलाट करत होते, झुळझूळ वारं वाहात होतं. नकळतच मन अगदी प्रसन्न झालं. चालता चालता सहजच त्याने तिचा हात धरला, अगदी पुर्वीसारखा,
आणि तिला वाटलं, "काहीच तर नाही बदलयय. उगीचच आपण मनात काहीतरी विचार आणुन उदास होतो, अजुनही याला आपली कीती गरज आहे, अजुनही आपणच याचा सहारा आहोत. छे, उगीचच रागावतो आपण."
"लेट्स हॅव कॉफी !" त्याच्या प्रश्नाने ती भानावर आली. रस्ता संपताच कॅफ़े होता. ती हो म्हणाली.
वाफाळलेल्या कॉफीचा एक मस्त घोट घेत तिने विचारलं "नविन अल्बमवर चाललय काम? छान वाटलं मगाचं गाणं"
"हो ग, अल्बम नविन आहे पण पॅरामाउन्ट म्युझिक साठी काढायचा आहे. गेल्याच आठवड्यात त्यांची ऑफर आलीय. या गाण्यानंतर कॉंट्रॅक्ट् साईन करणार आहेत"
तिचा तिच्या कानावर विश्वासच बसेना. ही येवढी मोठी बातमी, हा माणूस ईतक्या सहज काय सांगतोय? पॅरामाउन्ट म्युझिक चं कॉंट्रॅक्ट् म्हणजे काय साधी गोष्ट आहे?
अरे कमीत कमी फाईव मिलचं तरी असेल. हा खरचं सांगतोय की ... ती जवळजवळ किंचाळलीच ...
"ओह् माय् गॉड्, काय म्हणतोयस तु ? माझी चेष्टा तर नाही ना करत? अरे, आणि आज सांगतोस मला?"
"ओके, ओके....अगं, एकतर यात येवढं काय आहे? मी तर नेहमीच कॉन्फिडन्ट होतो की त्यांना आज ना उद्या माझी कींमत कळेल ते" तो त्याच्या नेहमीच्याच बेफिकिरीत.
तरिही, ती अजुनही धक्क्यातच् ... आनंद, आश्चर्य, त्याच्या उदासिनतेने झालेला हिरमोड ...अनेक भावनांनी भांबवून गेली.
मग, दोघेही चालत घरी आले, येताना त्याने तिला सगळा प्रोजेक्ट्चा प्लान सांगितला. खुप दिवसांनी तिने खुप रस घेउन सगळं ऐकलं.
घरी आल्याबरोबर तिने वाईन काढली आणि कितीतरी वेळ ती दोघे उद्याच्या स्वप्नातच हरवून गेले.
आणि खुप खुप सुन्या रात्रींनंतरची ती बेधुंद रात्र दोघांनाही पुन्हा जुन्या जगात घेउन गेली.
नेहमीप्रमाणेच , तो लहान बाळासारखा तृप्त झोपी गेला, आणि ती तशीच विचारात बुडुन गेली.
अचानक, तिला एक प्रकारची पोकळी जाणवायला लागली.
आता, रे ला तिच्या पैशाची गरजच नाही रहाणार. त्याला मिळतील त्या रकमेपुढे तिचा सो कॉल्ड् लट्ठ् पगार म्हणजे एक जोकच असेल.
त्याच्या मनातही हे असलं काही येणार नाही हे पक्कं ठाउक होतं तिला, पण तिच्याही नकळतच तिने तिचं अस्तित्वच तेवढ लहान करुन टाकलं होतं.
ती सगळे कष्ट करत होती कारण बिच्चारा रे स्ट्रगल् करत होता. ती आधार देत होती त्याला, सांभाळत होती. तिच्यामुळेच तर तो तरत होता.
आता काय राहीलं प्रयोजन तिच्या असण्याचं?
रे म्हणतो तसं स्वतःसाठी जगायचं. म्हणजे काय करायचं नक्की? आजपर्यन्त ती फक्त कुणाला ना कुणाला खुश करण्यासाठीच जगली होती. त्यातच आनंद मानत होती.
मग आता, कष्ट तरी कुणासाठी करायचे? ज्याच्यासाठी ती हे सगळं करत होती, जो पुर्णपणे तिच्यावर अवल्ंबुन होता, त्याने कीती सहज तिच्या पंखांखालून स्वतःला काढुन घेतलं?
अगदी काहीही गाजावाजा न करता. जणूकाही, त्याला त्या आधाराची गरजच कधी नव्हती. मग काय ती उगीचच त्या भ्रमात जगत होती?
त्याच्या यशाने तिला आनंद झाला नव्हता असंही नाही..."पण मग हे काय?.... ही बारीकशी कळ का येतेय? पोटात काहीतरी तुटल्यासारखं का वाटतंय?
पुन्हा तीच उदासी, पुन्हा तीच मनाची घालमेल... हवंय तरी काय आपल्याला...."
सकाळी, अलार्म झाला तेव्हा उठावसच वाटलं नाही तिला. एखाद्या स्पर्धेत हार झाल्यासारखी ती नुसतीच पडून राहीली...

No comments:

Post a Comment