Tuesday, October 27, 2015

माझ्या आवडत्या कथा

आभास हा

आभास हा
चंदू चं आयुष्य तसं एककल्लीच! सकाळी उठावं , चहा घेवून बाईकला किक मारावी , गल्लीतल्या किराणा मालाच्या दुकानातून १० गुटख्या च्या पुड्या घ्याव्यात ,एक तिथेच फोडून तोंडात टाकावी ,आणि दिवसाचा शुभारंभ करावा ! मग थोडं चावडीवर भटकून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात आणि बातम्या काढाव्यात. आणि मग सरळ घर गाठावं. अंघोळ-पूजा उरकून आईने दिलेला डबा घेवून मग कंपनी गाठावी....
कोकणातलं समुद्रकिनाऱ्या वरचं गाव! १५ वर्ष पूर्वीच इथं एक परदेशी कंपनी आली, लोकांनी खूप विरोध केला ,पण शेवटी कंपनी राहिलीच! मग चंदू ला कंपनीत मुकादम म्हणून काम लागलं . तसा होता चंदू आयटीआय केलेला ! पण कामासाठी बाहेरगावी जायचं तर आई सोडेना , बाबा लहानपणीच सोडून गेलेला ,घरची एवढी मोठी बागायत आणि आंब्या-फणस-काजू ची बाग /गुरे –ढोरे ! मग आई घाबरली .चंदुला म्हणाली, “बाबा चंदू , गावाजवळ कुठं काम मिळतं का बघ बाबा ,मि नाय तुला मुंबईला पाठवणार .इकडं कोण रं करील इतक्या गुरांचं आणि शेती-भाती? “
झालं , मग चंदू ला आपल्या आळशीपणा ला लपवायचं कारणाच मिळालं कि ! पण त्याच्या दुर्दैवाने ही कंपनी सुरु झाली ,आणि आईने एका स्थानिक राजकारण्याचा वशिला लावून चंदू ला तिकडे चिकटवला आणि चन्दूची उंडगेगिरी बंद झाली . मग चन्दूची नोकरी सुरु झाली . सकाळीं ९ ते संध्याकाळी ६ ,मध्ये १ तास सुट्टी-जेवायला ! पगार १५०००/- रुपये .
घरावरून कामाच्या ठिकाणी जायला मध्ये लौंचने[होडी] खाडी पार करावी लागायची! मग चंदू घरून सायकल वरून बंदरापर्यंत जायचा , लौंच आली ,कि सायकल सकट नंदू आत बसायचा ,आणि पलीकडच्या धक्क्यावर उतरून पुन्हा सायकलने कंपनीत जायचा ,येताना पुन्हा तसेच!
तर झालं असं की एकदा लौंच ने चंदू कंपनीत जात असतानां एक नवीन मुलगी त्याला दिसली .दिसायला छानच होती . मस्त गुलाबी साडी ,दणकट बांधा ,आणि खाडीच्या वाऱ्यावर उडणारे लांबसडक केस ! चंदू ला तर ती स्वप्नातली परीच वाटली ! आतापर्यंत आयुष्यात चंदू ने अशी पोरगी पहिलीच नव्हती ! दिसता क्षणी प्रेमात पडाव अशी........एकदा तर चंदुला वाटलं जावं आणि नाव विचारावं.पण ते धाडस त्याच्याने होईना ! मग तो तसाच एकटक तिच्याकडे पाहत राहिला ,तेवढ्यात किनारा कधी आला आणि बोट धक्क्याला कधी लागली तेही नाही कळल त्याला !
दिवसभर मग कंपनीत तिचाच विचार ! कामात मन लागेना ! तश्याच तिच्या विचारांच्या धुंदीतच दिवस गेला ,आणि ...............चन्दूचा डोळ्यावर विश्वासच बसेना !परत येताना बोटीत तीच !अरेच्चा! चंदू तर आनंदाने वेडा व्हायचाच बाकी राहिला ! स्वारी एकदम खुश! त्याने ठरवलं ,हिची माहिती काढायची! त्याची रात्र मग तिच्याच स्वप्नात गेली ,झोप कधी लागली आणि उजाडलं कधी तेही कळलंच नाही, आईने मोठ-मोठ्याने हाका मारून उठवलं तेव्हा कुठे जाग आली ! चंदू मग पटापट तयार होवून कामावर निघाला . आजही बोटीत ती होतीच . मग चंदूने आपला जिगरी दोस्त परश्याला तिची बातमी काढायला सांगितलं ,आणि परत येताना संध्याकाळी बोटीत परश्याला तिला दाखवलंही .
परश्या ने २ दिवसात तिची सगळी माहिती काढली , तिचं नाव मोहिनी . ती त्याच्याच कंपनीत नवीनच कामाला लागली होती . स्टोअर डीपार्टमेंट ला . अन् ती राहायलाही चन्दुच्याच गावात होती,भाड्याने खोली घेवून! चंदू आनंदाने वेडा झालां . मग पुढची सगळी सेटिंग चंदू आणि परश्या ने व्यवस्थित केली ,आणि एकदा चंदूने धीर करून तिला विचारलंच!
चंदू तसा दिसायला बऱ्यापैकी होता , त्यात आता प्रेमात पडल्यानंतर त्याने नवीन इस्त्रीचे कपडे ,अत्तर इत्यादी छानछोकी करायला सुरवात केली ,तो गावात राहूनही आणि वासुगिरी करूनही त्याचं बोलणं गावन्ढळ नव्हतं ,त्यामुळे तिलाही तो थोडाफार आवडला होता , पण एकदम होकार देण्या ऐवजी थोडं भाव खावूनच मग तिने होकार दिला .......आणि मग काय मंडळी , पुढच्या दिवाळीतच चंदूच्या लग्नाचा बार वाजला ! आईसुद्धा एवढी देखणी आणि नोकरीवाली सून मिळाली म्हणून आनंदात होती ! चंदू आता चंद्रावर पोचला होता !
चन्दूचे दिवस मजेत जात होते! असेच ५-६ महिने गेले . पण अलीकडे मोहिनीला कामावरून यायला उशीर होऊ लागला . पूर्वी ते दोघे एकदमच कामावर जात आणि परत येत ,आता चंदूने मोटार सायकल पण घेतली होती . पण हल्ली रात्रीचे ८-९ वाजले तरी मोहिनी येत नव्हती ,कधी कधी तर ११-१२ सुद्धा .मग उशीर झाला कि कंपनीची बोट तिला सोडायला यायची! चंदूने विचारले तर कंपनीत काम वाढलंय म्हणून संगायची ...हळू हळू तिच्या अंगावर अनेक दागिनेही दिसू लागले ,चंदूने चौकशी केली तर ओव्हर-टाईम च्या पैश्यातून घेतले आहेत असे सांगायची...तरीही चंदूच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागलीच !
आणि त्या दिवशी तर कहरच झालां ,त्या रात्री मोहिनी घरी आलीच नाही .आली ती एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी ! आता मात्र चन्दूचा फ्युज उडाला ! इतके दिवस जे मनात खदखदत होतं ते बाहेर आलं , चंदूने मग परष्याला विश्वासात घेवून सगळं सांगितलं . परश्याने २-३ दिवसात जी माहिती आणली त्याने तर चंदूच्या हातापायातील बळच गेलं ,संतापाने त्याच्या मेंदूची लाहीलाही झाली , स्टोअर डीपार्टमेंटचा मनेजर शुक्ला तसा हरामीच! पण दिसायला गोरा-गोमटा आणि बोलायला एकदम गोडगोड ! या शुक्ला ने मोहिनी ला आपल्या जाळ्यात ओढली होती ,तिच्यावर पैश्याची खैरात करून तो तिला रात्री थांबवायचा आणि नको नको ते रंग उधळायचा !
हे समजल्यावर चंदू ला काहीच सुचेनासं झालं , आपल्या बायकोनेच आपला विश्वासघात केला , आणि या हरामखोर शुक्ला पायी? चंदूच्या तळपायाची आग मस्तकात गेली . आणि कधी नव्हे ती त्याची पावलं दारूच्या गुत्त्याकडे वळली . १-२-३-४ ...चंदू ग्लास च्या ग्लास रिते करीत गेला ...आणि मग कधीतरी उशिरा रात्री गुत्त्याबाहेर पडून बाईकला किक मारली ...परत येताना नेमका शुक्ला जीप घेवून समोरून आला ,आधीच चंदू प्यालेला ,त्यात या शुक्लाच्या पायीच आपली बायको आपल्याशी बेईमान झाली या विचाराने तो हैराण झाला .आता या शुक्ला ला धडा शिकवायचाच ! चंदूने आपल्या बाईकचा स्पीड तुफान वाढवला आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ बाईक शुक्ला च्या जीप वर चढवली !
जाग आली तेव्हा चंदू हॉस्पिटल मध्ये होता ,उजव्या हाताला आणि पायाला भलेमोठे ब्यांडेज!उठताही येईना ! तेवढ्यात आई ,मोहिनी आणि परश्या समोरून खोलीत आले .डॉक्टर जे म्हणाला ते ऐकून त्या दुखण्यातही चंदूच्या जीवाला फार बरे वाटले –
“अरे चंदू केवढा मोठा एक्सीडेंट रे ! नशीब म्हणून वाचलास ..तुझी बाइक रस्त्याच्या बाजूच्या खडकावर आदळली ! ठोकर चुकवण्यासाठी त्या शुक्ला साहेबांनी गाडी बाजूला वळवली आणि रस्त्यावरून गाडी नदीत पडली , त्यातच त्यांचा अंत झाला रे !”
इकडे मोहिनी डोळे पुसत होती आणि परश्या मात्र चंदू कडे बघत गालातल्या गालात हसत होता !

No comments:

Post a Comment