सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?
- रेहान फझल
- बीबीसी प्रतिनिधी

फोटो स्रोत,GETTY IMAGES
सद्दाम हुसैनना 30 डिसेंबर 2006 साली फाशी देण्यात आली. सद्दाम हुसैन यांच्या सुरक्षेसाठी बारा अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले होते.
हे बारा सैनिक त्यांचे आयुष्यभराचे मित्र झाले नाहीत, पण त्यांचे शेवटच्या काळातले सोबती नक्की होते.
सद्दाम यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या 551 मिलिट्री पोलिस कंपनीतून निवडल्या गेलेल्या सैनिकांना 'सुपर ट्वेल्ह्व' म्हणून ओळखलं जायचं.
या बारा सैनिकांपैकी एक असलेल्या विल बार्डेनवर्पर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. 'द प्रिझनर इन हिज पॅलेस, हिज अमेरिकन गार्ड्स, अँड व्हॉट हिस्ट्री लेफ्ट अनसेड' नावाच्या पुस्तकात त्यांनी सद्दाम हुसैन यांच्या शेवटच्या दिवसांबद्दलची माहिती दिली.

फोटो स्रोत,GETTY IMAGES
विल बार्डेनवर्पर
सद्दाम हुसैन यांना फाशी देणाऱ्या लोकांच्या ताब्यात दिल्यानंतर सद्दाम यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सर्व सैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले होते, असं बार्डेनवर्पर यांनी म्हटलं आहे.
'सद्दाम आजोबांसारखेच वाटायचे'
बार्डेनवर्पर यांनी अॅडम रोजरसन या आपल्या साथीदाराचा हवाला देऊन लिहिलं आहे, "आम्ही सद्दाम यांना कधीच मनोविकृत मारेकरी म्हणून पाहिलं नाही. ते आम्हाला आमच्या आजोबांप्रमाणे वाटायचे."
सद्दाम यांच्यावर आपल्या 148 विरोधकांच्या हत्येचा आदेश देण्याबद्दल खटला चालविण्यात आला होता.
सद्दाम यांचे शेवटचे दिवस हे इराकमधील तुरूंगात अमेरिकन गायिका मेरी जे ब्लाइजा यांची गाणी ऐकण्यात गेले. त्यांना त्यांच्या एक्सरसाइज बाइकवर बसायला आवडायचं. ते या बाइकला 'पोनी' म्हणायचे.
त्यांना गोड खायला खूप आवडायचं. मफिन्स खाण्यासाठी ते नेहमी तयार असायचे.
बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, शेवटच्या दिवसात सद्दाम यांचं त्यांच्यासोबतचं वागणं खूप नम्र होतं. सद्दाम त्यांच्या काळातील सर्वांत क्रूर शासक होते, असं जराही त्यांच्या वर्तनातून जाणवायचं नाही.
कॅस्ट्रोनं शिकवलं होतं सिगार ओढायला
सद्दाम यांना 'कोहिबा' सिगार पिण्याचा शौक होता. वेट वाइप्सच्या डब्यात ते या सिगार ठेवायचे.
अनेक वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रोनं आपल्याला सिगार ओढायला शिकवलं असल्याचं सद्दाम सांगायचे.

फोटो स्रोत,GETTY IMAGES
फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन
बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, सद्दाम यांना बागकामाची खूप आवड होती आणि ते तुरुंग परिसरात उगवलेल्या झाडाझुडपांनाही एखाद्या सुंदर फुलाप्रमाणेच पहायचे.
सद्दाम त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल अतिशय संवेदनशील होते.
नाश्त्यामध्ये ते आधी ऑमलेट खायचे. मग मफिन आणि त्यानंतर एखादं ताजं फळ. चुकूनही जर त्यांचं ऑमलेट तुटलं, तर ते खायला नकार द्यायचे.
बार्डेनवर्पर लिहितात की, सद्दाम यांनी एकदा आपला मुलगा उदय याच्या क्रूरतेचा एक किस्सा सांगितला होता. उदय याच्या त्या कृत्यामुळे सद्दाम प्रचंड संतापले होते.
उदय यानं एका पार्टीत गोळीबार केला होता. त्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते तसंच जखमी झाले होते. यामुळे सद्दाम इतके नाराज झाले की, त्यांनी उदयच्या सगळ्या गाड्यांना आग लावण्याची आज्ञा केली.
उदयच्या महागड्या रोल्स रॉइस, फेरारी, पोर्शसारख्या महागड्या गाड्यांना कशी आग लावून देण्यात आली हे सद्दाम मोठमोठ्यानं हसून सांगत होते.
भावनाशील सद्दाम
सद्दाम यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या एका अमेरिकन सैनिकानं त्यांना सांगितलं की, त्याच्या भावाचा मृत्यू झाला आहे. हे ऐकल्यावर सद्दाम यांनी त्याला मिठी मारली आणि म्हटलं, "आजपासून तू मला तुझा भाऊ समज."
सद्दाम यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अजून एका सैनिकाशी बोलताना म्हटलं होतं की, जर मला माझे पैसे वापरण्याची परवानगी मिळाली तर मी तुझ्या मुलाच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च उचलायला तयार आहे.

फोटो स्रोत,GETTY IMAGES
एका रात्री सगळ्यांनी पाहिलं की, डॉसन नावाचा वीस वर्षांचा एक सैनिक ढगळा होणारा सूट घालून फिरत होता. सद्दाम यांनी आपला सूट डॉसनला भेट म्हणून दिला होता.
बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे, "आम्ही खूप दिवस डॉसनला हसायचो. कारण तो सूट घालून डॉसन एखाद्या फॅशन शोमध्ये कॅटवॉक करत असल्याच्या ऐटीत फिरत होता."
सद्दाम आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांची मैत्री होत होती. अर्थात, सद्दाम यांच्या फार जवळ न जाण्याच्या त्यांना स्पष्ट सूचना होत्या.
सद्दाम यांच्यावरील खटल्यांच्या दरम्यान त्यांना दोन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
एक बगदादमधील आंतरराष्ट्रीय लवादाचं तळघर होतं आणि दुसरा उत्तर बगदादमधला त्यांचा महाल होता, जो एका बेटावर होता. तिथपर्यंत एका पुलावरून जावं लागायचं.
बार्डेनवर्पर लिहितात, "आम्ही सद्दाम यांना आवश्यकतेपेक्षा जास्त काहीच दिलं नाही. पण त्यांच्या स्वाभिमानाला कधीच धक्का पोहोचवला नाही."
स्टीव्ह हचिंसन, क्रिस टास्कर आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्टोअर रुमला सद्दाम यांच्या कार्यालयाचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न केला होता.
सद्दाम यांचा 'दरबार' भरविण्याचा प्रयत्न
सद्दाम यांना 'सरप्राइज' देण्याची योजना आखण्यात आली. अडगळीच्या खोलीतून एक छोटा टेबल आणि चामड्याचं कव्हर असलेली खुर्ची बाहेर काढली. टेबलावर इराकचा छोटा झेंडा ठेवण्यात आला.

फोटो स्रोत,GETTY IMAGES
बार्डेनवर्पर लिहितात, "या सगळ्याच्या मागे हा विचार होता की, आम्ही तुरूंगातही सद्दाम यांच्यासाठी शासनप्रमुखाच्या कार्यालयासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सद्दाम जेव्हा पहिल्यांदा त्या कार्यालयात आले, तेव्हा एका सैनिकानं पटकन झुकून टेबलावरची धूळ झटकून साफ केली.
सद्दाम यांनी या कृतीची दखल घेतली आणि खुर्चीवर बसून हसले.
सद्दाम रोज येऊन त्या खुर्चीवर बसायचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक त्यांच्या समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचे. जणूकाही सद्दाम यांचा दरबार भरला आहे असं वातावरण निर्माण व्हायचं.
बार्डेनवर्पर सांगतात की, सद्दाम यांना खूश ठेवण्याचा सैनिकांचा प्रयत्न असायचा. सद्दामही त्यांच्यासोबत चेष्टामस्करी करायचे. वातावरण आनंदी राहायचं.
सद्दाम यांना जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांची चौकशी करायचे.
या पुस्तकातला सर्वांत आश्चर्यचकित करणारा किस्सा म्हणजे सद्दाम हुसैन यांच्या मृत्यूनंतर या सैनिकांनी शोक व्यक्त केला होता. सद्दाम हे अमेरिकेचे कट्टर शत्रू समजले जायचे, त्यामुळेच या सैनिकांची ही कृती चकित करणारी होती.

फोटो स्रोत,GETTY IMAGES
त्या सैनिकांपैकी एक होते अॅडम रॉजरसन. त्यांनी विल बार्डेनवर्पर यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं वाटलं होतं. आम्ही स्वतःलाच त्यांचे मारेकरी समजत होतो. आमच्या खूप जवळच्या व्यक्तिला मारल्याप्रमाणे आम्हाला वाटत होतं.
सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर आणण्यात आला. त्यावेळी तिथे उभे असलेले लोक त्यांच्या मृतदेहावर थुंकले.
अमेरिकन सैनिकांना वाटलं आश्चर्य
बार्डेनवर्पर लिहितात, "हे पाहून सद्दाम यांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षा करणारे 12 सैनिक आश्चर्यचकित झाले."
त्यांच्यापैकी एकानं जमलेल्या गर्दीसोबत दोन हात करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्या साथीदारांनी त्याला मागे खेचून घेतलं.
या सैनिकांपैकी एक असलेल्या स्टीव्ह हचिन्सन यांनी सद्दामला फाशी दिल्यानंतर अमेरिकेच्या लष्करातून राजीनामा दिला होता.
हचिसन्स 2017 पर्यंत जॉर्जियामध्ये बंदुका आणि टेक्निकल ट्रेनिंगचा व्यवसाय करत होते. सद्दाम हुसैन यांच्या मृतदेहाचा अपमान करणाऱ्या इराकी नागरिकांसोबत संघर्ष न करण्याचे आदेश मिळाले असल्याचा त्यांना खेद वाटतो.
आपल्याला फाशी होणार नाही, अशी सद्दाम यांना शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती.
अॅडम रोझरसन नावाच्या सैनिकाने बार्डेनवर्पर यांना सद्दाम यांच्याशी झालेला संवाद सांगितला होता. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा सद्दाम यांनी व्यक्त केली होती.

फोटो स्रोत,ROMEO GACAD
30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम यांना पहाटे तीन वाजता उठविण्यात आलं.
थोड्या वेळात फाशी देण्यात येईल, असं सद्दाम यांना सांगितलं. हे ऐकल्यावर सद्दाम यांना आतमध्ये काहीतरी तुटल्याची जाणीव झाली. त्यांनी शांतपणे आंघोळ केली आणि फाशीला सामोरं जायला स्वतःला तयार केलं.
आपल्या फाशीच्या काही मिनिट आधी सद्दाम यांनी स्टीव्ह हचिन्सन यांना आपल्या तुरुंगाच्या कोठडीबाहेर बोलावलं. आपल्या मनगटावरचं 'रेमंड व्हील' घड्याळ त्यांनी हचिन्सनला दिलं.
हचिन्सननं विरोध केला तेव्हा सद्दाम यांनी स्वतःच्या हातानं ते घड्याळ त्यांच्या मनगटावर बांधलं. हचिन्सन यांच्या जॉर्जियामधल्या घरातल्या कपाटावर ते घड्याळ अजूनही टिकटिक करताना दिसतं.